'ट्रॉलिंग' च्या नौकांना मुबलक बेबी म्हाकूळ
रत्नागिरी : वातावरणातील बदलांचे परिणाम समुद्रातील मासळीवर होत आहेत. सध्या बांगडा, कोळंबी मासळी कमी प्रमाणात मिळत असल्याने दर वधारले आहेत तर ट्रॉलिंगच्या नौकांना बेबी म्हाकुळ मासा मोठ्या प्रमाणात मिळत आहे. आवक वाढल्यामुळे म्हाकुळचा दर किलोला १०० ते ११० रुपयांपर्यंत आला आहे. व्यावसायिकांकडून योग्य दर मिळत नसल्याचे स्थानिक मच्छीमारांचे मत आहे.
ऑगस्ट महिन्यात गिलनेट, ट्रॉलिंगद्वारे तर १ सप्टेंबरपासून पर्ससिननेट जाळीचा वापर करुन मासेमारी सुरु झाली आहे. यंदा वादळी वारे, पाऊस अनियमित आहे. खोल समुद्रातील मासा किनाऱ्याकडे येण्यासाठीचे वारे अजूनही वाहू लागलेले नाहीत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मिळणारा मासा अपेक्षित जाळ्यात सापडलेला नाही. श्रावण महिना असल्यामुळे अनेक मच्छीमारी नौका बंदरावरच उभ्या होत्या तर काही नौका मासेमारीला जात आहेत, परंतु त्यांना अपेक्षित मासे मिळत नाहीत. हंगामाच्या सुरवातीला मिळणारा बांगडा मासा आता कमी झालेला आहे.
गिलनेटच्या नौकांना अवघा ३ ते ४ किलो बांगडा मिळत आहे. त्यामुळे मच्छीमारांचा खर्चही वसूल होत नाही. अनेक नौका बंदरावच उभ्या आहेत. सध्या मासळी बाजारातही बांगड्याचा दर १०० ते १२० रुपये किलो तर टायनी कोळंबीचा दर १०० रुपयांवरुन १५० रुपये किलोने विकली जात आहे. ट्रॉलिंगच्या नौकांना बेबी म्हाकुळ मोठ्या प्रमाणात मिळत आहे. एका नौकेला साधारणपणे एक ते दीड टन म्हाकुळ मिळत आहे. परंतु किलोचा दर १०० ते ११० रुपयेच आहे. हा दर ३०० ते ३५० रुपये किलो असणे अपेक्षित आहे. एका फेरीला नौकांना १ ते सव्वा लाख रुपये मिळत आहेत. त्यामधून खर्च वजा जाता अपेक्षित फायदा मिळत नाही. मिळणाऱ्या मासळीमधून तीन लाखाहून अधिक उत्पन्न अपेक्षित आहे.
प्रतिक्रिया : किनाऱ्यापासून दोन किमी अंतराच्या परिसरात अपेक्षित मासळी मिळत नाही. त्यामुळे गिलनेटने मासेमारी करणाऱ्यांनी नौका उभ्या करून ठेवल्या आहेत. एका फेरीचा खर्चही हाती येत नाही.... सौरभ नाटेकर ( मच्छीमार )